profile

Thoughts become Things!

तुम्ही कधी श्लोक लावून घेतला आहे का?


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

खरं तर मी हे पत्र लेखन म्हणजेच ब्लॉग रायटिंग, माझ्या बिझनेस ला मदतीचं ठरेल या नावाखाली सुरु केलं होतं. बिझनेस करता करताच मी अनेक पुस्तकं वाचायचो. त्या पुस्तकांमधील काही आवडलेल्या गोष्टी वेगळ्या लिहून ठेवायचो. मग ही आधुनिक पुस्तके वाचता वाचता, मी आपलेच प्राचीन भारतीय ग्रंथ वाचू लागलो. ह्या ग्रंथांमधल्या ओव्या, श्लोक, गोष्टी आपल्या सध्याच्या लाईफस्टाईल सोबत किंवा बिझनेस सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि ह्या प्रक्रियेत मला खूप आनंद मिळायला लागला.

चला तर मग! आजच्या पत्राकडे वळूयात! ह्या पत्रात आपण अनोळखी ठिकाणी आपली ओळख निर्माण करण्यासाठी जी स्ट्रॅटर्जी असते ना ती शिकून घेऊया. ती पण समर्थ रामदास स्वामींकडून. शेवटी काही रिकमेंडेशनस् आहेत त्या बद्दल पण बोलूया. लेट्स गो!

श्लोक लावून घेण्याला महत्व आहे.

गोष्टी, कथा, कहाण्या! लहानपणी आज्जी आजोबांकडून ऐकलेल्या, चांदोबा त वाचलेल्या! आठवतायत? मनोरंजनासोबतच शिकवण हा ह्या भारतीय गोष्टींचा फार महत्वाचा भाग आहे. आपल्याकडच्या गोष्टी या फक्त आनंद घेण्यासाठी नसतात. गोष्टी वाचून, ऐकून आनंद तर मिळतोच पण त्या मधून असं काही तरी शिकण्यासारखं असतं जे आपण आयुष्यभर रोजच्या जगण्यात वापरू शकतो. श्लोक असतील, ओव्या असतील, गोष्टी असतील - त्या लावून घेणं हे प्रत्येकाने शिकून घ्यावं.

समर्थ एका ओवीमधे म्हणतात

समजले आणि वर्तले। तेचि भाग्यपुरुष जाले।

या वेगळे उरले। तें करंटे पुरुष ।। २५ ।।

पण बरेचदा आपण करंटेच ठरतो. गोष्टींमधून समजून घेतलेलं वर्तनात येतंच असं नाही म्हणून मग लोकं सुद्धा "कीर्तन, प्रवचन ऐकल्या सारखं काय ऐकतो, वर्तनात आण." असा टोमणा मारतात. ही चूक भरपूर केलीय आपण साऱ्यांनी. भारतीय लोकांनी भारतीय संस्कृती मधल्या भरपूर गोष्टी ऐकून त्या वर्तनात आणल्याच नाहीत. आणि काही वर्तनात आणल्या जरी असतील तरी त्या पाहिजे तश्या प्रेझेन्ट झाल्या नाहीत. म्हणून मला श्लोक लावून घेणं हे फार महत्वाचं आहे असं मनापासून वाटतं.

आता मी मला लावून घेतलेल्या ओव्या सांगतो

श्री समर्थांनी साडेचारशे वर्षांपूर्वी काय अफाट कार्य केलं. आजच्या मॉडर्न दृष्टिकोनातून बघायला गेलं तर समर्थांनी त्यांच्या एका विचाराची एक ब्रांच उघडली.आणि मग एक एक करत अशा १००० हुन जास्त फ्रेंचायझीझ उघडल्या. त्यांचा एक युनिफॉर्म होता त्यांची एक टू डू लिस्ट होती, Do's and Dont's होते, KT (Knowledge Transfer) होते, ट्रेनिंग होती, networking होतं, मार्केटिंग होतं, लीडरशिप होती - सगळं होतं. फरक इतकाच की जे सगळं आपण आज पैसे कमवण्यासाठी करतो तेच सारं त्या काळात समर्थ आणि त्यांचे अनुयायी देश सेवेसाठी, राष्ट्र उभं करण्यासाठी करायचे.

तेव्हाचे समर्थांचे शब्द आजच्या भाषेत समजून घ्यावे लागतात इतकंच. आपण लीडर म्हणतो तर समर्थ महंत म्हणायचे. आपण Daily Work म्हणतो तर समर्थ त्याला उपासना म्हणायचे. आपण कोल्ड कॉल करून एखाद्या अनोळखी व्यक्ती पर्यन्त पोहोचतो तर समर्थ तेच काम भिक्षा गोळा करून करायचे. ह्या समर्थ सांप्रदायिक भिक्षेची पण फार मोठी गम्मत आहे बरं ! पण आपण परत कधी तरी एखाद्या पत्रात त्या विषयी बोलूया.

तर असे समर्थांचे जे काही समास, त्यांच्या लीडर्स साठी (महंतांसाठी) आहेत ते सगळे मला आज कामाला येणारे आहेत असे वाटतात. उदाहरणार्थ एक विवरण निरूपण नावाचा समास आहे. त्या समासामध्ये समर्थ अनोळखी ठिकाणी जाऊन कसा कार्य विस्तार करावा हे सांगतात. आजच्या भाषेत सांगायचं तर "capturing new markets! " . २३ ओव्यांमधे समर्थ पूर्ण SOP (Standard Operating Procedure) सांगत आहेत. नीट अभ्यास केला तर समजेल. अगदी असेच instructions एका नवीन जागेवर नवीन ब्रांच उघडायची असेल तर कंपनी ती फ्रेंचायझी ओनर ला देत असते.

तर कोणा कोणाला समर्थांची SOP शिकायची आहे? पुढे वाचा.

SOP by one and only Shri Ramdas Swami

मी खाली लिहिलेल्या ओव्यांमधे काही शब्द हायलाईट करतो आहे कारण त्याचा अर्थ आजच्या आयुष्यात जोरात लागतो.

मागां बोलिले लेखनभेद ⁠। आतां ऐका अर्थभेद ⁠।

नाना प्रकारीचे संवाद ⁠। समजोन घ्यावे ⁠।⁠।⁠ १ ⁠।⁠।

नाना पूर्वपक्ष सिद्धांत ⁠। प्रत्ययो पाहावा नेमस्त ⁠।

अनुमानाचें खस्तवेस्त ⁠। बोलोंचि नये ⁠।⁠।⁠ ४ ⁠।⁠।

हेत समजोन उत्तर देणें ⁠। दुसऱ्याचे जीवीचें समजणें ⁠।

मुख्य चातुर्याचीं लक्षणें ⁠। तें हें ऐसीं ⁠।⁠।⁠ ६ ⁠।⁠।

बहुत बोलणें ऐकावें ⁠। तेथें मोन्यचि धरावें ⁠।

अल्पचिन्हें समजावें ⁠। जगदांतर ⁠।⁠।⁠ ८ ⁠।⁠।

शोध घेतां आळसों नये ⁠। भ्रष्ट लोकीं बैसों नये ⁠।

बैसलें तरी टाकूं नये ⁠। मिथ्या दोष ⁠।⁠।⁠ १२ ⁠।⁠।

अंतर आर्ताचें शोधावें ⁠। प्रसंगीं थोडेंचि वाचावें ⁠।

चटक लाउनी सोडावें ⁠। भल्या मनुष्यासी ⁠।⁠।⁠ १३ ⁠।⁠।

उत्तम गुण प्रगटवावे ⁠। मग भलत्यासी बोलतां फावे ⁠।

भले पाहोन करावे ⁠। शोधून मित्र ⁠।⁠।⁠ १५ ⁠।⁠।

ठाईं ठाईं शोध घ्यावा ⁠। मग ग्रामीं प्रवेश करावा ⁠।

प्राणीमात्र बोलवावा ⁠। आप्तपणें ⁠।⁠।⁠ १७ ⁠।⁠।

जगामधें जगमित्र ⁠। जिव्हेपासीं आहे सूत्र ⁠।

कोठें तऱ्ही सत्पात्र ⁠। शोधून काढावें ⁠।⁠।⁠ १९ ⁠।⁠।

सकळामधें विशेष श्रवण ⁠। श्रवणाहुनी थोर मनन ⁠।

मननें होये समाधान ⁠। बहुत जनाचें ⁠।⁠।⁠ २२ ⁠।⁠।

धूर्तपणें सकळ जाणावें ⁠। अंतरीं अंतर बाणावें ⁠।

समजल्याविण सिणावें ⁠। कासयासी ⁠।⁠।⁠ २३ ⁠।⁠।

आता बोलूया अश्या सगळ्या वाचकांसोबत, जे ह्या सगळ्या ओव्या स्क्रोल करून इथे डायरेक्ट या पॅराग्राफ वर आलेले आहेत. तुम्ही सगळ्या ओव्या वाचल्या असतील तर उत्तमच. जर नसतील वाचल्या आणि स्क्रोल करून इथे आले असाल तर त्यात काही वाईट वाटून घेऊ नका. आपल्या ग्रंथांमधली मराठी थोडी वेगळी असते. त्यामुळे थोडी दुर्बोध, थोडी जड वाटते म्हणून अगदी एक ओवी वाचण्याचा सुद्धा जाम कंटाळा येतो. पण जर नेटाने ओव्या वाचल्याचं तर हळू हळू सवय होऊन जाते थोड्या दिवसात.

हा पूर्ण समास म्हणजे SOP आहे. पण त्या मधले मी काही निवडक पॉईंट्स सांगतो. समर्थ सांगतात जे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचं बोलत असतात ते समजून घ्यावे. "अनुमानाचें खस्तवेस्त" म्हणजे समजलेलं नसतानाही काहीतरी अंदाज लावून उगीच बोलू नये. कोणी प्रश्न विचारला तर त्याच्या मनातला हेतू समजून मग उत्तर द्यावे. समोरच्या च्या मनातलं ओळखून मग उत्तर देणे हे चातुर्याचं लक्षण आहे. लोकं बोलताना भरपूर ऐका पण स्वतः तेथे मौन धरा. कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्याची गरज पडली तर आळशी पणा करू नका. कोणी दुःखी असला तर त्याला आधार द्या आणि मदत करून त्याला आपली चटक लावून सोडा. भरपूर मित्र बनवा. गोड बोलणे असले की मित्र आपोआप बनतात. श्रवण तर कराच पण मनन हे श्रवणापेक्षा श्रेष्ठ आहे. समाधान हे मननातून होत असते. स्वतः शिकल्याशिवाय कोणालाही काहीही शिकवायला जाऊ नका.

आहे की नाही मस्त SOP आणि वर कोणी शिकवली आहे तर प्रत्यक्ष श्रीसमर्थांनी. अर्थ तसा खूप खोल आहे पण मी मला समजलेला, लावून घेतलेला अर्थ जमेल तितक्या सोप्प्या भाषेत मांडला आहे. अशा काही ओव्या, श्लोक तुम्ही लावून घेतले आहेत का? असतील तर मला नक्की कळवा. पुढच्या रविवारी अजून एक वेगळा विषय घेऊन आपण नक्की गप्पा मारूया.

Recommendation of the Week

जर एका आठवड्यामधे एखादं पुस्तकं, नाटक, चित्रपट मी पहिला आणि तो मला खूप आवडला आणि प्रत्येकाने बघावा असा काही असेल तर मी कधी कधी या एका भागात त्या बद्दल लिहीत असतो. या आठवड्यात मी एक पुस्तक वाचलं "Before the coffee gets cold" या नावाचं. छान पुस्तक आहे एका जापनीज लेखकाचं. ज्या मधे त्याने टाइम ट्रॅव्हल चा कन्सेप्ट सांगितला आहे. एका कॉफी च्या दुकानात कॉफी ऑर्डर करून ती थंड होई पर्यंत आपण भूतकाळ किंवा भविष्य काळात जाऊन परत येऊ शकतो. मग कसे ग्राहक टाईम ट्रॅव्हल करतात ही फार छान गोष्ट आणि त्या मधून छान शिकवण पण आहे. जे मला आवडतं तो प्रकार या पुस्तकात आहे.

दुसरा रेकंमेंडेशन म्हणजे एक ऍनिमे वेब सिरीज आहे ज्याचं नाव आहे "साकामोटो डेझ". ज्यांना विनोदी, मारामारी, शक्ती पेक्षा युक्तीने जिंकणारी टीम या पद्धतीच्या गोष्टी बघायला आवडतात त्याने ही सिरीज नक्की बघावी. एक साकामोटो नावाचा भरपूर ट्रेनींग घेतलेला व्यक्ती असतो जो चोरांना मारत असतो पण त्याला प्रेम होतं, तो लग्न करतो आणि चोरांना मारण्याचं काम सोडून देतो. पाच वर्षांनंतर तो आता जाड झालेला आहे पण ते शिकलेलं अजूनही अंगवळणी पडलेलं आहे. पुन्हा एकदा गरज आहे म्हणून तो घर, दुकान, बायको, मुलगी ह्या सगळ्यांना सांभाळत सांभाळत कसं चोरांना पकडण्याचं काम करतो हे बघताना फार मज्जा येते. आणि पुन्हा एका उत्कृष गोष्टी मधे छान शिकवण पण आहे.

भेटूया पुढच्या पत्रात.तोपर्यंत — स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि श्लोक स्वतःला लावून घेण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद!

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.

Thoughts become Things!

I write weekly about entrepreneurship, storytelling, books, life lessons, simple thoughts from old Indian texts, and the meaningful experiences in my life. Each article comes from my journey and curiosity.

Share this page