We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, हे पत्र तुम्हाला ज्या दिवशी मिळणार त्या दिवशी आहे भाऊबीज. तुम्हाला प्रत्येकाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या माझाव्यापार कडून खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा सणच असा काही आहे आपला की या दिवसात सगळेच्या सगळे खुश असतात. आणि इतक्या छान दिवशी माझाव्यापार म्हणजेच अजिंक्य ने लिहिलेलं पत्र मिळावं. वा..वा…काय छान योग म्हणावा. तर नेहिमीप्रमाणे जरा रिकॅप करूया “और अब आगे” असं म्हणून आजचं पत्र लिहितो. कारण माझे पत्र हे एपिसोड सारखेच आहेत. मागच्या पत्राचा काही रेफरन्स कदाचित असेल आणि मग पुढचा एक नवीन विषय. मागच्या पत्रात मी माझा रक्तदानाचा अनुभव लिहिला होता. त्याच्या आधी विज्ञानाने केलेला नवीन चमत्कार त्या बद्दल काही बोलणं झालं होतं. असे वेगवेगळे विषय चालतच रहाणार. तुम्ही जर पहिल्यांदाच माझा पत्रं वाचत आहात तर मागचे सगळे पत्र इथे वाचू शकतात. जुने पत्र वाचा. आणि दर रविवारी असं छान काहीतरी वाचायला मिळावं अशी इच्छा असेल तर नक्की Subscribe करा. दोन गाड्या आणि वाहन चालक एक मेकांना भिडलेआजचा विषय पण खास आहे आणि मला आलेल्या अनुभवाचा आहे. आवडेल. वाचणाऱ्या प्रत्येकाला आवडेल असा काही विषय आहे. आज काल ना आपले इगो बघा फार वर वर येत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो. मला असं कसं काय बोलू शकतो? मी काय ऐकून घेण्यासाठी बसलो आहे का? असे काही वाक्य ऐकू आले किंवा तुम्ही बोलून गेले तर समजून चला इगो वर आला आहे. आता गाडी चालवताना जर दोन गाड्या एकमेकांना चुकून धडकल्या मग तर झालंच. मारामारीच बघायला मिळणार. बरं गंमत अशी की जवळपास सगळ्या गाड्या इन्शुरन्स मधे येतात. थोडं जास्त नुकसान झालं तरी ते आपण खूप कमी खर्चात भरून काढू शकतो ही परिस्थिती आहे. वेळेचं नुकसान काय किंवा कोणाला लागलं काय, ह्यापैकी कुठलंही नुकसान इन्शुरन्स काय कोणीच भरून देऊ शकतं नाही. पण विचार करा दोन गाड्या एक मेकांना चुकून चिटकल्या कोणालाही काहीही मार लागला नाही गाडीचं नुकसान मात्र झालं आहे (जे इन्शुरन्स मधे आपण भरून काढू शकतो) तरीही कसे लोकं भांडायला उठतात. तर एकदा काय झालं एका गर्दी असलेल्या चौकात दोन दुचाकी स्वार हेल्मेट घातलेले जोरात आले आणि दोन्ही गाड्या गडबडीत असल्यामुळे एक मेकांना धडकल्या. नशीब इतकचं की दोघांनाही काहीही लागलं नाही. पटकन पडलेलं उठले. दोघांनीही हेल्मेट घातलेलं होतं म्हणून त्यांचे चेहरे काही दोघांना समजले नाही. आणि दोघांनी एकमेकांची कॉलर धरली. तितक्यात लोकं जमले. काही जणांनी त्यांचे हात पकडले. दोघांनी जोर जोरात शिव्या दिल्या आणि हेल्मेट काढले. बघतात तर काय हे दोघे वर्ग मित्र जे कित्तेक वर्षांपासून भेटलेले नव्हते. ओळख पटायच्या आधीच लूक असा होता दोघांचा! एक जण म्हणाला, “अरे योगेश तू!” दुसरा म्हणाला, “अरे गण्या!” दोघांचे आवाज पटकन बदलले. शिव्या आता “लागलं तर नाही ना रे तूला” मधे बदलून गेल्या. आणि आता शिव्या निघाल्या त्या प्रेमामधे निघाल्या. पहिला मित्र, “अरे हरामखोर अजून नीट चालवायला शिकलाच नाही का गाडी.” “तू मधे आलास माठ्या.” दुसऱ्या मित्राने आवाज चढवून उत्तर दिलं. बघा हं… आधी पण शिव्याच देतं होते आणि आता पण शिव्याच देत आहेत पण फरक खूप आहे. “चल चहा घेऊ बाजूला, गाडीचं बघू काय करायचं ते.” दोघे जी काही तुटलेली गाडी होती ती ढकलत बाजूला लावून चहाच्या टपरी वर गप्पा मारत बसले. प्रेम आणि द्वेष एका जागी नाही थांबू शकतकाय बदल झाला बरं जेंव्हा त्यांना समोरचा ओळखीचा आहे हे समजलं? ह्याच उत्तर काय आहे माहिती का? प्रेम आणि द्वेष हे दोघे एका ठिकाणी नाही थांबू शकतं. ज्या क्षणी हा आपला लहानपणीच मित्र आहे हे समजलं त्याचं क्षणी राग, द्वेष, तुटलेली गाडी, लागलेला मार, वाया जाणारा वेळ सगळं संपलं आणि “चल चहा घेऊ! बघून घेऊ बाकीचं” हे समोर आलं. आपण सोबत आहोत हे महत्वाचं आहे बाकी चालू रहात हा विचार मनात आला. हे जर सगळं असं होऊ शकतं तर मग अनोळखी व्यक्तीसोबत का नाही होऊ शकत? कोणी कोणाला रस्त्यावर गाडी ने टक्कर ठरवून मारतो का? काहीतरी चूक होते म्हणून होतो तो ऍक्सीडेन्ट. मग तेंव्हा का नाही समजून घेत आपण? कारण मधे येतो इगो. अहंकार. माझ्या गाडीला कशी काय टक्कर मारली? मेलो असतो तर? अरे पण नाही मेला ना. आहेस ना जिवंत. नको व्हायला पाहिजे ते झालं पण जे खूप जास्त वाईट होणार होतं त्या पेक्षा खूप कमी वाईट झालं ह्याचा विचार करून आपण शांत पणे परिस्थिती प्रमाणे वागूया हे इतकं पण अवघड नाही. मी आज का बरं दोघांचे भांडण सांगतो आहे?आता ही गोष्ट मला कश्या वरून आठवली ते सांगतो. आता दिवाळी मधे नाही का आपले सगळे मित्र, मैत्रिणी, भाऊ, ताई, भाऊजी सगळे भारतात परत येतात जे वर्षोन वर्षे भारताच्या बाहेर रहात असतात. तसाच माझा एक मित्र, त्याची बायको आणि त्याचा मुलगा म्हणजे पूर्ण कुटुंब भारतात आलं. मी माझ्या मुलाला त्याला भेटयला घेऊन गेलो. माझा मुलगा आणि त्याच्या मुलगा दोघांमधे एका वर्षाचं अंतर असेल. त्या दोघांचं एकदा कधीतरी व्हिडिओ वर सोबत बोलणं झालं होतं. बोलणं झालं होतं म्हणजे नुसतं तोंड पाहिलं होतं. कारण माझा मित्र रहातो जर्मनी ला. त्याच्या मुलाला जर्मन बोलण्याची सवय आहे. माझा मुलगा बोलतो मराठी. दोघे सुद्धा अजूनही पटकन समजेल इतकं स्पष्ट बोलतं नाहीत. तर हे दोघे आमच्या घरी खेळायला सोबत भेटले. आता गम्मत बघा. माझ्या मुलाला अजून स्प्ष्ट बोलता येत नाही माझ्या मित्राच्या मुलालाही स्प्ष्ट बोलता येतं नाही आणि त्यात तो बोलला तर जर्मन बोलतो जे आपल्याला समजत नाही. पण दोघे काय खेळतं होते. वा.. बघण्यासारखं होतं. क्रिकेट झालं, गाड्या झाल्या, सोबत फटाके उडवून झाले, उद्या मारून झाल्या, स्पायडर मॅन सारखं करून झालं जे शक्य त्यांना माहिती असलेलं सगळे खेळ खेळून झाले. का समोरच्याने घेतलेलंच खेळणं दुसऱ्या मुलाला पाहिजे असतं आणि मग त्या वरून भांडायचं असतं? कडाडून भांडल्यानंतर २ मिनिटात दोघे असे वागत होते. आता खूप वेळ खेळून झालं चला घरी जाऊ म्हणून मी म्हणालो तर दोघेही जायचं नाही अजून खेळायचं म्हणून रडतं होते. ठीक आहे वेळ आहे म्हणून मी बराच वेळ खेळू दिलं पण माझ्या लक्षात आलं हे दोघे काही ऐकणार नाही म्हणून मीच आता घरी जाऊ असा काही तरी विषय काढून कसा बसा निघालो. तर दोघांचं जोरात भांडणं आणि रडणं सुरु झालं. का बरं? तर एक जण दुसऱ्याची कार मागत होता आणि एकाला द्यायची नव्हती. हे भांडण कसं तरी तू माझ्या दोन कार घे मी तुझ्या दोन घेतो असं काही तरी करून शांत झालं. परत आठवण झाली तर पुन्हा भांडण होऊ शकतं पण सध्या शांत आहे. इतकं करून आम्ही घरी आलो आणि माझं आणि माझ्या मित्राच बोलणं झालं तर दोघेही “उद्या कधी परत खेळायला जायचं न्यू फ्रेंड सोबत?” हाच प्रश्न विचारतं होते. कोणाला खरं वाटेल की हे दोघे आत्ता दोन कार साठी इतके रडतं आणि भांडत होते म्हणून. इगो काहीतरी भलतेच प्रश विचारतो आपल्यालागंमत ही आहे की ह्यांना इगो माहिती नाही. त्याने मला कार आधी दिली पाहिजे!, मी माझी कार का देऊ?, आज इतका भांडला उद्या कशाला पाहिजे मी खेळायला? असं वागतो ना माझ्या सोबत खेळू दे आपलं आपलं हे सगळं मी जे काही लिहिलं आहे ना हे त्यांना समजतंही नाही. हे सगळे प्रश्न आपल्या डोक्यात येतात. मला दिवाळी ला शुभेच्छा देणारा मेसेज पण नाही पाठवला मी कशाला करू फोन? मी शुभेच्छा दिलेल्या मेसेज ला साधा थँक यू रिप्लाय करता येतं नाही. पुढच्या वर्षी पासून मेसेज करणंच बंद करतो. माझ्या सोबत काढलेला फोटो मला क्रॉप करून टाकतो का इन्स्टा ला! आता ह्याच्या पुढे एका फोटोत पण बाजूला उभा रहाणार नाही ह्याच्या. बाहेरच्या देशाच्या इतक्या गप्पा मारतात साधे चॉकलेट पण दिले नाहीत. इतका इगो? अरे किती रे हा इगो. मी म्हणतो गरज काय आहे? मी तर म्हणतो समोरचा कसा वागतो, काय बोलतो, काय विचार करतो, त्याचे परिणाम काय होणार हे सगळं जर मीच विचार करायचं तर मग त्याने काय करायचं? समोरच्या ला वागतो तसा वागू द्या. कारण ते बदलणं तुमच्या माझ्या हातात नाही. तर दिवाळी हा दिव्यांचा सण आहे ना? दिवा लावला की अंधार कसा पळून जातो? तसंच आपण ह्या दिवाळी ला आपल्या डोक्यात प्रकाश पाडूया आणि आपल्या आयुष्यात असलेल्या व्यक्ती ज्यांच्या बद्दल मनात अंधार आहे तो अंधार पळवून लावूया. असा लख्ख प्रकाश पडला पाहिजे. ह्या दिवाळी ला लावलेल्या दिव्याचा प्रकाश तुमच्या डोक्यात लख्ख पडूद्या आणि जसा माझा मुलगा आणि त्याचा न्यू फ्रेंड जसे मनापासून खेळले (भाषा समजत नसताना), मनापासून भांडले, मनापासून आपले खेळणे दिले, मनापासून घरी जाताना रडले आणि मनापासून परत कधी सोबत खेळणार हे सुद्धा विचारलं तसेच आपण सुद्धा बनूया. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा द्या, कुठल्या गोष्टीवर भांडायचं असेल तर मनापासून भांडा, मग मनापासून त्यांना थँक यू म्हणा कारण भांडण करायला ते तुमच्या आयुष्यात आहेत, भरपूर फोटो काढा परत कधी असं निवांत भेटून गप्पा होतील ते विचारा पण हे सगळं इगो ला बाजूला ठेऊन. काय छान वाटतं ना दिवाळी च्या दिव्यांचा असा प्रकाश पडला की? आणि त्या इगो ला बसू दे अंधारात. काही कामं धंदे नाही त्याला. भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आपल्या आपल्या कामात मस्त रहा. दिवाळी पहाट बद्दल एक सांगायचं होतं.दिवाळी म्हणलं की दिवाळी पहाट, पहाट पाडवा, गाण्यांच्या महफ़िली असे खूप सारे गाण्यांचे कार्यक्रम आपल्या कडे होतं असतात. ह्या कार्यक्रमांना काही जण आनंदाने तर काही जण “बायको सोबत जावं लागतंय” म्हणून जात असतात. असाच मी एका कार्यक्रमाला आनंदाने गेलो होतो. आता गाणं म्हणणाऱ्या भरपूर मुली आपण पहिल्या असतील पण मी पहिल्यांदाच एका मुलीला इतका छान तबला वाजवताना पाहिलं. सहसा मुलंच तबला वाजवताना दिसतात. गाणं सुद्धा इतकंच अप्रतिम चालू होतं की तो तबल्या चा ताल मनात बरोबर जागी बसतं होता. ह्या दोघी मुली, एक तबल्यावर आणि एक गाणं म्हणायला, ह्या दोघीनींही कार्यक्रम इतका छान रंगवला. शेवटच्या गाण्याला तर मला आठवतं आहे जवळपास सगळे टाळ्या वाजवत नाचत होते. तुम्ही ह्या दोघिनां इंस्टाग्राम वर फॉलो केलं पाहिजे. गाणे म्हणायला होती कल्याणी लोखंडे आणि तबल्या वर होती सई बाराबोटे. लाईव्ह ऐकणं तर छानचं आहे पण इंस्टाग्राम वर पण ह्यांचा प्रत्येक व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे. दोघींना इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा.
|
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!