profile

Thoughts become Things!

आपणं कोणाचं ऐकत नसतो!


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

तर आजचं पत्र आपण सुरु करूया एका खास आणि कमाल व्यक्तीचे अभिनंदन करून. गुकेश डोम्माराजू म्हणजेच भारताचा सगळ्यात कमी वयाचा चेस चॅम्पियन. हा मुलगा फक्त १८ वर्षाचा आहे. त्याचं वय सांगणं मला का महत्वाचं वाटतं माहिती का कारण आपण कधीही काहीही ठरवलं आणि त्याच्यावर रोज काम करत गेलो तर ते आपल्याला मिळतं हा जगाचा नियम आहे. पण आपल्याला काय मिळवायचं आहे हे समजे समजे पर्यंत लोकं म्हातारे होतात. खूप जणांना म्हातारं होई पर्यंत सुद्धा माहित नसतं.

गुकेश जिंकल्या नंतरचे दृश्य.

पण खूप कमी वयात गुकेशना माहिती होतं, त्याला माहिती होतं म्हणण्यापेक्षा त्याच्या आई वडिलांना माहिती होतं आणि त्यांनी ते बरोबर त्याला शिकवलं ही कमाल आहे. मला गुकेश बद्दल तर वाचायचं आहेच, पण मला जास्त उत्सुकता त्याच्या आई वडिलांचा एखादा interview ऐकण्याबद्दल आहे. माझाव्यापारच्या टीम कडून गुकेशना आणि त्याचा आई वडिलांना विशेष शुभेच्छा.

तर आज आहे रविवार आणि माझं पत्र आलंच पाहिजे. प्रत्येक रविवार पत्र पाठवणं ह्याचे फायदे तर इतके आहेत ना. मी तर म्हणेल तुम्ही लिहून बघा. माझे फायदे सोडा स्वतः अनुभव घ्या म्हणजे कळेल. कोणाला पाठवलं नाही तरी चालेल आठवड्याला एकदा लिहिणं तरी सुरु करा. काहीही लिहा, पण लिहा.

पण आजच्या पत्रात लिहिणं सुरु करण्याची इच्छा किंवा कुठलंही काम करायची इच्छा जिथून सुरु होते ना त्या बद्दल बोलूया. ऐकणे.

ऐकणं का महत्वाचं आहे?

एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे Listening: The Forgotten Skill" by Madelyn Burley-Allen हे लेखक सांगतात की आपण ऐकणं विसरणे ह्याच सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपलं मन हे खूप साऱ्या गोष्टींमुळे विचलित झालेलं आहे. We all must kill the Distractions.

हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा!

मी जेंव्हा वेगवेगळे पुस्तकं, "ऐकणे" ह्या विषयावरचे वाचले तेंव्हा मला जाणवलं की ऐकणे ही आपल्या मनाची अंघोळ आहे. तुम्ही म्हणाल मी रोज ७ च्या बातम्या ऐकतो. ते ऐकणे नाही. माझ्या मते ७च्या बातम्या ऐकणे म्हणजे अंघोळ कसली, चिखलात जाऊन उडी मारण्याचा प्रकार झाला. जसं आपण रोज घर झाडतो, रोज भांडी घासतो, रोज अंघोळ करतो, रोज कपडे धुतो तसंच मनही रोज साफ झालं पाहिजे का नाही? ते करण्यासाठी रोज सेल्फ हेल्प ह्या विषयाखाली येणाऱ्या सगळ्या पुस्तक, लेख, ऑडिओ, व्हिडिओ वाचणे, बघणे, ऐकणे आणि जे काही वाचलं, ऐकलं ते कुठे इम्प्लिमेंट होतं आहे का? हे सगळं "तुम्ही रोज काही ऐकता का?" ह्या प्रश्नाच्या उत्तरामधे येऊ शकतं.

अकबर बिरबल ह्यांच्या गोष्टी!

अकबर बिरबल आपण लहान पणापासून ऐकत आलो आहोत. एकदा अकबराच्या दरबारात एक मूर्तिकार तीन मुर्त्या घेऊन येतो. ह्या तीन मुर्त्या हुबेहूब दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या होत्या. मुर्तीकाराने राजाला विचारलं की, "आहे का तुमच्या कडे कोणी विद्वान जो ह्या तीन हुबेहूब दिसणाऱ्या मुर्त्यांमधला फरक सांगू शकेल?" राजाने साहजिकच बिरबलाला पुढे ढकललं. बिरबलाने तिन्ही मुर्त्या निरखून पहिल्या. त्या पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की खरोखर मुर्त्या खूपच हुबेहूब आहेत पण सगळ्या मूर्त्यांना कानाला एक छिद्र आहे. त्याने काही बारीक तारा मागवल्या आणि त्या छिद्रांमध्ये बारीक तारा टाकल्या. एका मूर्तीच्या कानात टाकलेली तार दुसऱ्या कानामधून बाहेर आली. एका मूर्तीच्या कानामधे टाकलेली तार तोंडातून बाहेर आली आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलेली तार हृदया पर्यंत येऊन थांबली.

बिरबलाने ह्यावरून ठरवलं की ह्या दिसायला हुबेहूब आहेत त्या मुळे दिसण्यावरून तरी ह्यांचा कोण चांगलं हा क्रम ठरवता येऊ शकत नाही. पण मी जेंव्हा तारा कानात टाकल्या तेंव्हा ज्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून तार बाहेर आली ती मूर्ती तिसऱ्या नंबर वर येईल. कारण एका कानाने ऐकणे दुसऱ्या कानाने सोडून देणे हा काही चांगला गुण नाही. दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकलेली तार तोंडातून बाहेर आली म्हणजे हिच्यात ऐकलं की पटकन कोणालातरी बोलून दाखवण्याचा गुण आहे. हा पण फार काही चांगला गुण नाही पण हिला मी दुसरा नंबर देईल. आणि तिसरी मूर्ती ज्या मधे टाकलेली तयार हृदया पर्यंत येऊन थांबली ती मूर्ती सगळ्यात उत्कृष्ट म्हणता येईल. ऐकणे ह्या पद्धतीचेच असावे. ऐकून सगळं ज्ञान हृदयात साठवता आलं पाहिजे.

बिरबलाच्या चातुर्यावर राजा आणि मूर्तिकार खूप खुश झाले. पण तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचे ऐकणारे आहात? मूर्ती नंबर एक सारखे, का दोन का तीन? पहिल्या मूर्ती सारखे म्हणजे ऐकून सोडून देतात. ते समजून घेणं, त्याच्यावर काम करणे हा काही प्रकारचं नाही. दुसऱ्या मूर्ती सारखे म्हणजे तुम्हाला काहीही ऐकायला मिळालं की तुम्ही आधी ते दुसऱ्याला सांगायला धावतात (व्हाट्सएप्प फॉरवर्ड वाली गॅंग), समजलं असो, नसो, अर्धवट समजलं असो, मला काहीतरी माहिती आहे हे दुसऱ्याला सांगायची घाई. आणि तिसरी मूर्ती जी ऐकून ह्रदयात ठेवते आणि जिथे गरज असेल तिथेच वापरते.

तुम्ही ऐकण्याची प्रॅक्टिस करतात का?

मी तरी इतके वर्ष झाले, ज्या मूर्तीची तार हृदया पर्यंत गेली ना त्या प्रमाणे ऐकण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्हीही तोच प्रयत्न करा. पण काय करणारं ऐकण्याची सवय राहिली नाही. मी काही दिवसांपूर्वी दासबोध वाचत होतो तेंव्हा मला काय जाणवलं माहिती का? न ऐकण्याचा प्रॉब्लेम आजचा नाही. खूप आधी पासूनचा आहे. ते कसं?

दासबोध विकत घेण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करा.

तर दासबोध ह्या ग्रंथात समर्थ रामदासांनी कीर्तनाला ऐकायला जाण्याच्या आधी काय काय करावे ज्या मुळे ऐकण्यात लक्ष लागेल ते लिहून ठेवलं आहे. आपण मीटिंग मधे म्हणतो ना ग्राउंड रूल्स किंवा मीटिंग रूल्स. तसे समर्थांना तेंव्हाच माहिती होतं की कसं ऐकावं हे शिकवावं लागणार आहे म्हणून. त्यांच्या काही ओव्या आहेत ज्या मी इथे खाली लिहितो. त्या थोड्या वेगळ्या मराठी मधल्या आहेत. जर तुम्हाला समजतं असेल तर उत्तमच, पण नाही समजलं तर मी ओव्यांच्या खाली मला समजलेला अर्थ थोडक्यात लिहिला आहे, तो वाचला तरी चालेल.

दशक १८ : समास १०

श्रोता अवलक्षण

श्रवणीं लोक बैसले ⁠। बोलतां बोलतां येकाग्र जाले ⁠।

त्याउपरी जे नूतन आले ⁠। ते येकाग्र नव्हेती ⁠।⁠।⁠ १० ⁠।⁠।

मनुष्य बाहेर हिंडोनी आलें ⁠। नाना प्रकारीचें ऐकिलें ⁠।

उदंड गलबलूं लागलें ⁠। उगें असेना ⁠।⁠।⁠ ११ ⁠।⁠।

श्रवणीं बैसले ऐकाया ⁠। अडों लागलीसें काया ⁠।

येती कडकडां जांभया ⁠। निद्राभरें ⁠।⁠।⁠ १३ ⁠।⁠।

मन दिसतें मां धरावें ⁠। ज्याचें त्यानें आवरावें ⁠।

आवरून विवेकें धरावें ⁠। अर्थांतरीं ⁠।⁠।⁠ १७ ⁠।⁠।

जें जें कांहीं श्रवणीं पडिलें ⁠। तितुकें समजोन विवरलें ⁠।

तरीच कांहीं सार्थक जालें ⁠। निरूपणीं ⁠।⁠।⁠ १६ ⁠।⁠।

निरूपणीं येऊन बैसला ⁠। परी तो उदंड जेऊन आला ⁠।

बैसतांच कासाविस जाला ⁠। त्रुषाक्रांत ⁠।⁠।⁠ १८ ⁠।⁠।

आधीं उदक आणविलें ⁠। घळघळां उदंड घेतलें ⁠।

तेणें मळमळूं लागलें ⁠। उठोनी गेला ⁠।⁠।⁠ १९ ⁠।⁠।

कर्पट ढेंकर उचक्या देती ⁠। वारा सरतां मोठी फजिती ⁠।

क्षणाक्षणा उठोनी जाती ⁠। लघुशंकेसी ⁠।⁠।⁠ २० ⁠।⁠।

दिशेनें कासावीस केला ⁠। आवघेंचि सांडून धांविला ⁠।

निरूपणप्रसंगीं निघोनी गेला ⁠। अखंड ऐसा ⁠।⁠।⁠ २१ ⁠।⁠।

कोणी निरूपणीं बैसती ⁠। सावकास गोष्टी लाविती ⁠।

हरिदास ते रें रें करिती ⁠। पोटासाठीं ⁠।⁠।⁠ २८ ⁠।⁠।

दशक १८ समास १० श्रोता अवलक्षण निरूपण ह्या समासात समर्थ सांगतात,

कीर्तनाला अथवा प्रवचनाला उशिरा जाऊ नये. (ओवी १०)

प्रवचनाला येण्यापूर्वी घरी अथवा बाहेर कुठे काही घडले असल्यास त्याची आठवण श्रवण करताना ठेऊ नये. (ओवी ११ )

श्रवण करताना झोप अथवा कंटाळा येऊ देऊ नये. (ओवी १३ )

श्रवण करताना मन इतस्तत: भटकू देऊ नये. (ओवी १७ )

वक्त्यांनी सांगितलेले मुद्दे नीट समजावून घ्यावेत. (ओवी १६ )

खूप जेवण करून अथवा खूप पाणी पिऊन श्रवणाला बसू नये. कारण अश्या वेळी शरीरधर्म आठवल्यास मन एकाग्र होणार नाही. (ओवी १८ ते २१)

काही श्रोत्यांना श्रवणाला वक्त्यापासून दूर बसायचे आणि आपापसात गप्पा मारायची अशी सवय असते. ते उपयोगी नाही. (ओवी २८)

आता तुम्ही जर कॉर्पोरेट मीटिंग किंवा कुठेही सभेला जात असाल तर तुम्हाला समजेल पहिल्या २-५ मिनिटात हेच सांगितलं जातं. आले फोन सायलेंट मोड वर ठेवा, लक्ष देऊन ऐका, मीटिंग मधे पहिला ब्रेक इतक्या इतक्या वेळाने होईल, बाहेर जे झालं आहे ते डोक्यात न ठेवता फक्त इथेच लक्ष द्या, डिस्कशन नीट समजून घ्या वगैरे वगैरे. पण ऐकण्यामधे आपण कंटाळा करणार हे समर्थांना चांगलं माहिती होतं वाटतं, म्हणून आधीच सांगून दिलं काय काय करावं ते.

ऐकणं आणि अगदी तसचं वागणं याला फार महत्व आहे. पण आज काल "करू नये" असं जिथे जिथे लिहिलेलं असतं ना ते करून मी कसा फार मोठा शहाणा हे दाखवण्याची फार घाई चालू असते. जे सांगितलं आहे ते न वागता काहीतरी वेगळं वागून आपण तात्पुरते नजरेत येतो, पण लॉंग टर्म ते काही कामाचं नाही.

आपण संतानी सांगितलेलं, आपल्या कंपनीने सांगितलेलं, धर्माने सांगितलेलं, सोसायटी ने सांगितलेलं, जिथे आपण रहातो तिथल्या सरकारने सांगितलेलं ऐकतो का? आपण जिथे रहातो तिथले काही लिहिलेलं किंवा अलिखित नियम असतात ते आपण ऐकतो का? का ते नियम मी कसे मोडले आणि कसा मला कोणी काही म्हणत नाही ह्याचा मोठेपणा वाटतो?

अरे भाई, कहना क्या चाहते हो?

मला सांगायचं इतकंच आहे की एकांतात असो किंवा समूहात, ऐकणे म्हणजे फक्त कानामध्ये आवाज जाऊन, काय आवाज आला तो समजणे नाही. वाचून, ऐकून त्या मधलं स्वतःला लागू होणारं घेणं, ते रोजच्या जीवनात आचरणात आणणे, इम्पलिमेन्ट करणे, ह्या सगळ्या वाचण्यातून, ऐकण्यातून, बघण्यातून जे काही करू नये म्हणून समजतं आहे ते रोजच्या जीवनातून काढून टाकणे म्हणजे ऐकणे.

तुम्ही माझाव्यापार चे पत्र वाचत आहात, हे पत्र आणि असेच छान लेख वाचता वाचता डेव्हलपमेंट होणार नाही तर कधी होणार? आज पासून आपण नेमके कसे ऐकतो ते नक्की तपासा. बिरबलाच्या गोष्टीमधल्या पहिल्या मूर्तीसारखं, का दुसऱ्या का तिसऱ्या? ऐकणं कसं दिवसेंदिवस चांगलं करता येईल हा प्रयत्न नक्की करा. आपण सगळे मिळून करूया. माझाव्यापार मधे आम्ही एकच गोष्ट मानतो Doing is Learning. तर आज या पत्रामधून काही शिकायला मिळालं असेल तर इम्पलिमेन्ट नक्की करा.

असेच आमचे पत्र वाचत रहा. आमचे पत्र आवडले तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे. Email Newsletter
आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.WhatsApp Community

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page