We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!
।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मनापासून आभार कारण तुम्ही माझं पत्र वाचण्यासाठी आलेले आहात. मागच्याच आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी माझं पत्र इंग्लिश मधे वाचलं. काही जणांना आवडलं, काही जण म्हणाले की आता मराठी मधे येणारचं नाही का? तसं काही नाही. मी ज्या माझ्या नवीन मित्रांचा उल्लेख केला होता ना त्यांना समजावं म्हणून ते इंग्लिश मधे होतं. मला सुद्धा मराठी मधे लिहिल्या शिवाय बरं वाटतं नाही. इंग्लिश झालं, आता परत आपण मराठी मधे गप्पा मारूया.
आजच्या पत्रात मी सांगणार आहे एक गोष्ट. गोष्ट आहे उजेडाची आणि अंधाराची आणि त्यांच्या होणाऱ्या भांडणाबद्दलची. स्वागत आहे एका नवीन पत्रात. आजचं माझं पत्र वाचून ठरवा तुम्ही उजेडाच्या बाजूने आहात का अंधाराच्या? हे भांडण खूप वर्षांचं चालूं आहे!ह्या कथेमधे दोन पात्र आहेत. उजेड आणि अंधार. Light and Darkness. एकदा अंधार तात्यांना उजेड महाराजांचा फार राग आला. तात्या म्हणाले, "मला जिथे जिथे जायचं असतं तिथे हा उजेड आला की मला जाताच येतं नाही. मी कितीही प्रयत्न केला पण जसा जसा उजेड कुठूनही, कितीही प्रमाणात येतो मला आपोआप पळावं लागतं. हे मला न पटणारं आणि ठीक ठिकाणी अडवणारं आहे. ह्या बद्दल मी उजेडावर केस करतो आहे. मला न्याय मिळालाच पाहिजे. मलाही कुठेही मुक्तपणे फिरता आलं पाहिजे." झालं, ही केस झाली रजिस्टर आणि तो दिवस आला ज्या दिवशी जज्ज साहेब दोघांच्याही बाजू ऐकण्यासाठी बसले. त्यांनी आधी अंधार तात्यांना बोलावलं. अंधार तात्या आले आणि त्याने आपलं रडगाणं सुरु केलं. "मला इथे जाता येतं नाही, मला तिथे जाता येत नाही, एकदा मी गेलो होतो शांत पणे बसलो होतो पण कोणीतरी एक टॉर्च घेऊन आला मला लगेच पळावं लागलं. मी खूप मोठा होतो पण इतकुश्या छोट्या टॉर्च समोर माझी काही चालली नाही. तुम्ही आज माझे हे हाल बघून उजेडाला शिक्षा द्या ही माझी विनंती आहे आणि मला मुक्त पणे फिरू द्या."
उजेड आला की अंधाराचं असचं होतं! जज्ज ने संपूर्ण बाजू ऐकली आणि म्हणाले, "अगदी बरोबर आहे तुमचं. आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. आपण कुठेही कधीही फिरू शकतो. कोणीही कोणालाही अडवलं नाही पाहिजे. आता मी उजेडाला बोलावतो आहे. तो आला की त्याच्या समोर सगळं सांगा आणि मग समोरासमोर बोलणं झालं की मी काय तो निर्णय देईल." उजेडाला आवाज दिला गेला. उजेड महाराज आले. जज्ज ने त्यांना खडसावून विचारलं, "काय हो उजेड महाराज. का तुम्ही या अंधार तात्यानां असा त्रास देतात? तुमच्या मुळे त्यांना सगळ्या ठिकाणी जाता येतं नाही. त्यांना पळवून लावण्याचं काम तुम्ही करतात म्हणे. तुम्हाला हे शोभतं का?" ह्या वर उजेड महाराज म्हणाले, "जज्ज साहेब मला तर ह्या बद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही एकदा ही तक्रार कोण करतो आहे त्याला समोर बोलावतात का? माझी काही चूक असेल तर मी नक्की सुधारेल. पण मला ज्याला त्रास होतो आहे त्याच्या कडून हे ऐकायचं आहे." जज्ज म्हणाले, "हे काय अंधार तात्या तुमची तक्रार घेऊन आले आहेत. अरे कुठे गेले? आत्ता तर होते इथे." आता बराच वेळ अंधार तात्यांची वाट बघितली आणि ते काही आले नाही. मग जज्ज म्हणाले, "तुम्ही एक काम करा. पुढच्या तारखेला या. आपण तेंव्हा काय नेमकं होतं आहे हे त्यांना विचारू." जसे उजेड महाराज गेले अंधार तात्या परत आले. "साहेब बघा असं होतं आहे. आता तो आला की मला येताच आलं नाही." जज्ज म्हणाले, "ठीक आहे. पुढच्या तारखेला या आपण समोरासमोर हे सगळं बोलू. तेंव्हाच मी काहीतरी निर्णय देऊ शकेल." ही केस आजही कोर्टात चालू आहे. अंधार आणि उजेड कधी समोर येऊ शकले नाही आणि जज्ज कधी निर्णय देऊ शकले नाही.
फक्त उजेड पडला पाहिजे बाकीचं अज्ञान म्हणजे अंधार तसाच निघून जातो. नेमकी ही गोष्ट काय सांगते?आज काल आपल्यावर प्रत्येक मिनिटाला एक माहिती येऊन धडकते आहे. आपण जे काही सोशल मीडिया वर शेअर करतो ते उजेड किंवा अंधार म्हणून बघितलं जाऊ शकतं. जसं ह्या गोष्टीमधे अंधार तात्या त्याचा मुद्दा मांडू शकले नाही त्याच प्रमाणे कोणाबद्दल चुकीचं बोलणं, वाईट बोलणं, हे सगळं समोर येऊच शकतं नाही जेव्हा खरं, सकारात्मक काही शेअर केलं जातं. अंधार तात्या तक्रारी करून, दुसऱ्यांवर बोटं उचलून प्रयत्न खूप करतील पण जसा उजेड आला तसं पळून जाण्याशिवाय काही उरणार नाही हे नक्की. माझं म्हणणं इतकंच आहे की प्रत्येकाने आपण उजेड कसे बनू शकतो हा विचार केला पाहिजे. छोटा मोठा तो भाग वेगळा. कितीही अंधार असू द्या एक छोटीशी काडेपेटीची काडी पेटवली तरी ती कितीही मोठ्या अंधाराला पळवू शकते. आता मी तुम्हाला उजेड आणि अंधाराचे काही उदाहरणं देतो तुम्ही ठरवा तुम्हाला कोण बनायचं आहे ते. १. शांत पणे बसून भरपूर पुस्तकं वाचणे म्हणजे उजेड आणि काहीही डोकं न लावता नुसतं स्क्रोल करत बसने, काहीतरी फालतू गॉसिप किंवा न्यूज बघणे म्हणजे अंधार. २. स्वतः अनुभवले काहीतरी चांगलं शेअर करणे म्हणजे उजेड (म्हणजे माझं रविवारच पत्र) आणि अंधार म्हणजे आलं काही व्हाट्सऍप्प ला की दे फॉरवर्ड करून, ते खरं आहे का चांगलं आहे का, कुठल्या व्यक्ती ला वाईट वाटेल असं काही आहे का, हा काहीही विचार न करता ढकलून देणे. ३. एखाद्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे म्हणजे उजेड आणि अंधार म्हणजे तो काहीही नवीन आयडिया घेऊन आला की न ऐकता वाईट बोलणे, हे असलं काही चालतं नसतं म्हणणे. ४. क्रिकेट सारखा स्पोर्ट्स बघणे, सगळ्या प्लेयर्स च्या स्किल्स, डिसीप्लिन, मेहनत, चुका बघणे आणि त्या प्रमाणे स्वतः मधे बदल घडवणे म्हणजे उजेड आणि अंधार म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं काम. त्या प्लेअर च्या पर्सनल आयुष्यात डोकं घालणे, कोणाचं लग्न झालं, कोणाचं लग्न मोडलं हे बघत बसणे, कोणाकडे किती पैसा आहे हे सगळे अंधार असण्याचे लक्षण आहेत . हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आज रविवार माझं पत्र आणि गुडी पाडवा एकत्र आलं. एक बरं झालं मला स्वतःला तुम्हाला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देता येतील. मी, "गुडी पाडव्याच्या शुभेच्छा" इतकाच मेसेज करून तर शुभेच्छा देऊ शकतं नाही. काही नवीन पद्धतीने शुभेच्छा देता येईल का हा विचार मी नेहमीचं करतो. ह्या वेळेस विचार करताना मी थोडा अभ्यास केला. इंटरनेट, गुगल, चॅट जीपीटी, काही पुस्तकं सगळं वापरून आणि वाचून मी ही माहिती काढली आहे. काही चुकीची असेल तर नक्की सांगा म्हणजे तसं आपण जिथून माहिती मिळाली त्यांना कळवू. ब्रह्म पुराणात असे वर्णन आहे की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो आणि नववर्षाच्या सुरुवातीस पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. रामायणात उल्लेख आहे की भगवान श्रीरामाने १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत प्रवेश केला तेव्हा लोकांनी आनंदाने गुढ्या उभारल्या. त्या विजयाचे प्रतीक म्हणून आजही गुढी उभारण्याची प्रथा आहे. महाभारतात असे सांगितले आहे की पांडव वनवास संपवून आपल्या राज्यात परत आले, तेव्हाही लोकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. गुढी म्हणजे विजय आणि शुभतेचे प्रतीक आहे. मराठा इतिहासात, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला आणि स्वराज्याची स्थापना केली. मराठ्यांनी विजयाच्या आनंदात गुढी उभारून हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यामुळे गुढी पाडवा हा मराठ्यांसाठी स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. आयुर्वेद आणि गुडी पाडवाआता हे सगळं महाभारत, रामायण, ब्रम्ह पुराण ह्या सगळ्यांमधे लिहिलेलं आहे, छानच आहे. हे वाचून आपण गुडी पाडवा नक्की साजरा करूया. पण मी प्रकाश अजून एका वेगळ्या गोष्टीवर टाकतो. आयुर्वेदानुसार गुढी पाडव्याला कडुलिंबाची चटणी खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. कडुलिंबाची पाने रक्तशुद्धी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी किंवा रस खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबाला "सर्वरोग निवारिणी" असेही म्हटले जाते कारण त्यात प्रतिजैविक (antibacterial), अँटीव्हायरल (antiviral), आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. असा माझा हा एक प्रयत्न होता गुडी पाडव्याच्या दिवशी तुमच्या डोक्यात आयुर्वेदाला विचारात घेऊन उजेड टाकण्याचा. मी आज लहिलेलं सगळं कदाचित तुम्हाला सगळं माहितीही असेल, पण मी सुरवातीलाच म्हणालो ना आपण सगळे उजेड होण्याचा प्रयत्न करू. हे पत्र वाचताना तुमच्या समोर किंवा डोक्यात कोणाचं नावं आलं ज्याला ही माहिती मिळण्याची गरज आहे तर तुम्ही उजेडाचं काम करा. एखाद्याच्या डोक्यात "हा फक्त एक धार्मिक सण आहे म्हणून साजरा करू" अश्या प्रकारचा अंधार असेल तर कदाचित तो अंधार हा फक्त धार्मिक सण नसून आयुर्वेद, निसर्ग आणि विज्ञानाशी जोडलेला एक संपूर्ण आरोग्यदायी सण आहे. त्यामुळे हा दिवस शरीरशुद्धी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि नवीन संकल्प करण्यासाठी उत्तम मानला जातो हा उजेड पडेल. अश्या माझ्याकडून प्रत्येक वाचकाला गुडी पाडव्याच्या फुल्ल ब्राईटनेस करून शुभेच्छा. आज पासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यातला उजेड अंधाररूपी प्रत्येक संकटाला पळून लावेल ही माझी खात्री आहे. भेटूया पुढच्या पत्रात.
शेवटी मी इतकंच सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या पद्धतीने उजेड पसरवण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्या Newsletter ला इथे. Email Newsletter
|
We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!