profile

Thoughts become Things!

ह्या मनाला ट्रेनिंग द्यावी तरी कशी?


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

स्वागत आहे आजच्या पत्रात. मी वेगवेगळे विषय लिहिण्याचा प्रयत्न नेहमीचं करतो पण जेंव्हा जेंव्हा समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या बद्दल मी काही लिहितो ना मला फार छान अश्या प्रतिक्रिया येतात. म्हणून आज पुन्हा एकदा समर्थ रामदासांना भेटूया, भेटूया म्हणजे त्यांचं लिहिलेलं वाचून मला काय समजतं आहे ते थोडक्यात बोलूया.(आणि बोलूया म्हणजे पण तेच नेहमीचं, मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार पण तरीही आपल्याला गप्पा मारल्या सारखं वाटणारं) लेट्स गो!

समर्थांना उत्तम प्रकारे घोडा ओळखता आणि चालवता येतं होता. मला कितीतरीवर्ष हे माहिती नव्हतं म्हणून आज खास हा फोटो इथे ठेवला.

शालेय शिक्षण कोणासाठी?

अभ्यास करून, शिक्षण घेऊन बुद्धी तल्लख तर होते पण मनाला शिकवणं हे वेगळं आहे. एखाद्याला शाळेत भरपूर अभ्यास करायची सवय आहे. त्याने अभ्यास केला पण तो वर्गात दुसरा आला. ह्या गोष्टीचा त्याला इतका राग आला की त्याने सगळं काही सोडलं. पुन्हा सगळं लक्ष अभ्यासावर लावलं. फक्त अभ्यास आणि अभ्यास केला आणि त्याच्या पुढच्या परीक्षेत पहिला येऊन मागच्या परीक्षेत पहिला आला होता ना त्याच्या समोर जाऊन कसा मी तुझ्या पेक्षा हुशार आहे, हे डोळ्यात डोळे घालून, त्याला तू हरला असं दाखवून, सांगून उद्या मारत तो घरी आला.

या उदाहरणात तुम्हाला अभ्यास करून स्वतः पहिला आलेला अभ्यासू आणि मेहनती मुलगा तुम्हाला दिसतं असेल पण मला दिसतं ते त्याचं मन. स्पर्धा करण्यात काहीही चूक नाही. केलीही पाहिजे. पण ह्या स्पर्धेला निमित्त पकडून मी कसा हुशार बाकीचे कसे ढ हे दाखवणं, कोणा पेक्षा मी कसा शहाणा हे सांगणं इथे गाडी ट्रॅक सोडून भलतीकडे निघाली समजा.

जरी तो आयुष्यात मोठा झाला तरी कोणाला तरी मी कसा मोठा, तू कसा लहान, मी कसा हुशार, तू कसा ढ ह्या तात्पुरता आनंद देणाऱ्या भावनेत तो राहील.

हे मनाला शिकवण्याचं काम कोणीतरी करावं की नाही? समर्थ म्हणाले काळजी नसावी (नो प्रॉब्लेम). मी तुमची मदत करतो. माझ्या कडे शिकायला येणाऱ्या सगळ्यांना, मी आधी हेच शिकवतो. हे घ्या मनाचे श्लोक. रोज १३ मनाचे श्लोक म्हणा आणि आपल्या मनाला ट्रेन करा. सिम्पल. त्यांनी बरोबर पॉईंट पकडला.

समर्थ उत्तम तिरंदाज ही होते. हे पण माहिती नसतं म्हणून पुन्हाएकदा फोटो माहिती साठी इथे ठेवतो आहे

तुम्ही यशश्वी व्यक्तीला आणि यशश्वी होऊन कायम आनंदी राहाणाऱ्या व्यक्तींना जेंव्हा बघणार ना तुम्हाला मेहनत, सराव, अभ्यास, शिस्त दोन्ही कडे दिसेल. ह्या सगळ्यांचं महत्व कमी किंवा जास्त नाही. पण जर मन बरोबर जागेवर नसेल तर अभ्यास, सराव करूनसुद्धा तात्पुरता आनंद मिळतो आणि मन जर जागेवर असेल तर ती यशाची आणि कायम आनंदी रहाण्याची सुरवात असते. मनाची जागा बदलली की सगळी गणितं फिरतात.

समर्थ मनाला कसे ट्रेनींग देतात बघा!

मनाचे श्लोक तर आहेतच पण बाकी सगळी कडे सुद्धा त्यांनी मन हे चंचल आहे आणि त्याला कसं धरून ठेवावं हे बरोबर समजावून सांगितलं आहे. बुद्धी दे रघूनायका ह्या त्यांच्या एका काव्यात ते लिहितात.

मन हे आवरेना कीं वासना वावरे सदा | कल्पना धावतें सैरा बुद्धि दे रघुनायका || २ ||

माझं मन मलाच आवरत नाहीये रे. क्षणोक्षणी वेगवेगळ्या वासना म्हणजे इच्छा होतं आहेत. माझ्या कल्पना तर सैरा वैरा धावत आहेत. रघूनायका बुद्धी दे रे ह्यांना कसं सांभाळू. खरं सांगा होतात का नाही क्षणोक्षणी इच्छा. कधी खावं वाटतं तर कधी झोपावं वाटतं, कधी काम करावं वाटतं, कधी काम न करावं वाटतं, कधी भरपूर बोलावं वाटतं, कधी काही बोलू नये वाटतं, वाट्टेल ते विकत घ्यावं वाटतं तर असलेलं उगीच घेतलं वाटतं. एक मिनिट शांत नाही मन. ह्या वर विजय मिळवण्यासाठी बुद्धी दे रे मला असं समर्थ म्हणतात.

मनाच्या श्लोकात तर किती प्रेमाने समजावून सांगतात समर्थ. त्यांना हे पण माहिती होतं की मनाला ऐक रे, नको रे, असंच असतं रे, सोडं रे अशीच भाषा कळते. म्हणून ते लिहितात, "मना सज्जना भक्ती पंथेची जावे। " पाहिलं काय लिहिलं आहे? जावे लिहिलं आहे. असं पण लिहू शकले असतें ना "मना सज्जना भक्ती पंथेची जाच।" हेच कर, तेच कर, असंच करायचं कोणी म्हणलं की आपण म्हणतो नाही करत जा!

जणी निंद्यते सर्व सोडून द्यावे। जगात ज्या ज्या वाईट गोष्टी असतील, त्या सर्व तू सोडून दे रे. जनीं वंद्यते सर्व भावे करावे। आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण भाव ओतून कर रे. अगदी छान प्रेमाने सांगतात.

समर्थ बेचकी चालवण्यात पण समर्थ होते.
आज-कालच्या भाषेत बेचकी म्हणाल तर समजणार नाही आजच्या भाषेत बेचकीला स्लिंग शॉट म्हणतात. ऍमेझॉन वर भरपूर प्रकारचे मिळतात. इथे तुम्ही विकत घेऊ शकता. Buy Sling Shot on Amazon.

मला तर ह्या एका ओवीच्या अर्थाने कानातच मारली!

पर्णाळि पाहोन उचले ⁠। जीवसृष्टि विवेकें चाले ⁠।

आणि पुरुष होऊन भ्रमले ⁠। यासी काये म्हणावें ⁠।⁠।

दासबोध दशक १२ : समास १: ओवी ११

कधी हनुवटी धरून वात्सल्यानें म्हणजेच प्रेमाने तर कधी मुस्काडीत मारून (ते पण प्रेमानेच), समाजाला शिकवण्याचे कार्य महाराष्ट्रात त्या काळी दोन संतांनी केले. एक तुकाराम महाराज आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी. दोघांच्याही हातात दंडुका आहे.

ही ओवी वाचताना समर्थ मला एक फटका देत समजावून सांगत आहेत असा भास मला झाला. आजच्या भाषेत ते म्हणतात की, "अरे झाडाच्या पानावर राहणारा जो किडा असतो त्याला सुद्धा इतकं समजतं की आधी पुढचं पान आपलं वजन घेऊ शकतं का ते बघून मग मागच्या पानावरचा पाय उचलावा. ही सगळी जीव सृष्टी विवेकाने चालते, ज्याला जे काम दिलं आहे तेच ती करते. आणि तू पुरुष म्हणजेच मानव ज्याला देवाने विशेष बुद्धी दिली आहे. तो बुद्धी असून सुद्धा असा अविवेकी वागायला लागला तर ह्याला काय म्हणावं?"

थोडक्यात काय तर प्रेमाने ते कान धरून दोन्ही पद्धतीने समर्थ आपल्याला समजावूनच सांगतात. आज वेगवेगळे अनुभव घेतले की हेच जाणवतं, मनाला ट्रेनिंग देण्याची गरज वरचे वर वाढतं चालली आहे. बाहेर ही ट्रेनिंग असेल महाग पण आपण ज्यांना मराठी वाचता येतं समजतं ते कसले लकी आहेत ना! कारण आपल्याकडे हे पुस्तकं आहे. गरज फक्त त्याला वापरामधे आणण्याची आहे. त्याचा रोज सराव करण्याची आहे.

तुमचं काम सोप्प करून देऊ का?

हे पत्र संपवता संपवता मनाच्या श्लोकांची फलश्रुती काय आहे ते वाचायला देऊन मग मी जातो.

मनाची शते ऐकता दोष जाती।

मतीमंद ते साधना योग्य होती ॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥

अर्थ खूप मोठा आहे पण थोडक्यात आजच्या भाषेत सांगतो. मनाचे श्लोक ऐकता ऐकता दोष नाहीसे होतात. आपण साधनेच्या योग्यतेचे बनतो. आपल्या अंगी ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य चढू लागतं. आणि आपण मुक्तीचा (सोपं जावं म्हणून मुक्तीच्या जागेवर आनंदाचा अनुभव समजा) अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतो.

मनाचे श्लोक रोज म्हणायची सुरवात करता यावी म्हणून मी तुमचं काम सोप्प करून देतो. एक यू ट्यूब चॅनेल आहे. समर्थायन या नावाने. या चॅनेल वर मनाचे श्लोक स्पष्ट, शुद्ध, वाचता येतील आणि ऐकता येतील असे छान १३-१३च्या ग्रुप मधे रेकॉर्ड करून आपल्यासाठी ठेवलेले आहेत. फक्त या चॅनेल वर जाऊन रोज १३ श्लोकांचा एक व्हिडिओ मी स्वतः ऐकतो आहे का ह्याची खात्री तुम्ही आणि मी घ्यायची आहे.

video preview

फोन तुमच्या हातात कायम असतो. आता असं सांगू नका वेळ नाही फोन वर मनाचे श्लोक लावायला. रोज ऐका, परत ऐका, परत ऐका आणि ऐकत रहा. रोज ऐकता ऐकता जर स्वतः मधे काही बदल जाणवले तर समर्थांना मनापासून नमस्कार करा.

आमचे पत्र जर नियमित पणे ई-मेल वर मिळावे असं वाटतं असेल तर Subscribe करा आमच्याNewsletter ला इथे.👉 Email Newsletter

आणि हे पत्र जर नियमित व्हाट्सऍप वर मिळावे असं वाटतं असेल तर ही आहे आमची व्हाट्सऍप कम्युनिटी लिंक इथे.👉 WhatsApp Community

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page