profile

Thoughts become Things!

तो काळजी घेणारा, आपण काळजी करणारे!


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

नवीन रविवार आणि नवीन पत्र. एक वेळ मला पत्रामधे काय लिहावं हे सुचेल पण हा पहिला पॅराग्राफ ना जरा अवघडच वाटतो. प्रत्येक आठवड्यात तुम्ही छान प्रतिक्रिया देतात, नवीन नवीन वाचक माझे पत्र वाचतात, मी पुढच्या आठवड्यात परत भेटेन, हेच वेगळ्या पद्धतीने प्रत्येक आठवड्यात म्हणजे ५२ वेळेस लिहायचं आहे मला. आहे ना अवघड?

पण ५२,००० वेळेस जरी लिहायचं असेल तरी सुचेल कारण सुचवणारा मी नाही तो आहे. (तो म्हणताना मी वरती आकाशाकडे बोट दाखवतो आहे.) आणि आजचं पत्र त्याच्याच बद्दलचं आहे. तो कोणासाठी श्री राम आहे, तो कोणासाठी हनुमान, कोणासाठी श्री कृष्ण, कोणासाठी ग्रंथ साहेब, कोणासाठी जीजस तर कोणासाठी अल्लाह. तो जो कोणी आहे त्याला आपली फार चिंता असते. खरंच असते का? चला गप्पा मारूया आजच्या पत्रात. लेट्स गो!

इतक्याचं आनंदाने तुम्ही हे पत्र वाचतातह्याची मला खात्री आहे! Thank you in Advance!

तो नेहमीचं माझ्या सोबत असतो!

मागच्या आठवड्यात आपण एका गणपती बाप्पांच्या भक्ताची गोष्ट ऐकली. ती वाचायची राहिली असेल तर इथे क्लिक करून वाचू शकतात. गणपती बाप्पाच्या भक्ताची गोष्ट. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका हनुमंतांच्या भक्ताची.

एक व्यक्ती होता जो हनुमानाचा अगदी मनापासून भक्त होता. त्याने इतकी उपासना केली की त्याला हनुमान सगळीकडे दिसायचे. ते दोघे अगदी मित्र झाल्या सारखे झाले होते. तो जर कुठे बाहेर पडला तर त्याला नेहमी २ अजून पावलांचे ठसे दिसायचे. पावलं दिसले की तो हनुमानाला मनापासून नमस्कार करायचा आणि मारुती त्याची नेहमी साथ द्यायचे.

एकदा तो भक्त प्रवासाला निघाला होता. नेहमीप्रमाणे स्वतःची दोन आणि हनुमानाची दोन अशी पावलं सोबत त्याला दिसतं होती. अधून मधून तो हनुमानासोबत गप्पा मारायचा, अधून मधून स्तोत्र म्हणायचा. असा प्रवास छान चालू होता. पण अचानक प्रवासामधे वादळं येण्याची शक्यता त्याला दिसायला लागली. एकदम काळे ढग जमले, पाऊस सुरु झाला, वारा जोरात वाहू लागला. अश्या वादळात जागा शोधावी म्हणून तो जोरात पळू लागला. त्याला पळता पळता आठवलं की अरे आपल्या सोबत तर हनुमान नेहमी असतात. ते तर स्वतः वायू पुत्र. ते आपल्याला काहीही होऊ देणार नाही. कितीही वारा येऊ दे का काहीही होऊ दे. असा विचार करून त्याने नेहमी सोबत असणाऱ्या दोन पावलांकडे पाहिलं.

त्याला इतकं आश्चर्य वाटलं कारण सोबतची पावलं दिसतं नव्हती. त्याला चारच्या ऐवजी दोनच पावलं दिसली. तो अजून घाबरला. इतके तिकडे पळू लागला. हे वादळ २-३ तास चाललं. तो जागा मिळेल तिथे लपत होता, पळत होता. कसा बसा इतक्या जोरदार वादळ आणि वाऱ्या मधे त्याचा जीव वाचला. आणि वादळ शांत झालं.

त्याने आपला जीव वाचला म्हणून नेहमीप्रमाणे हनुमानांना नमस्कार केला आणि लगेच त्याला दोन पावलांचे ठसे पुन्हा दिसायला लागले. पण तो चिडलेला होता. त्याने रागावून आणि चिडून विचारलं, "का आला आहेस आता परत? इतक्या वादळात मला तुझी गरज होती तेंव्हा आला नाही समोर. मला सोडून निघून गेला तू?"

आणि पहिल्यांदा त्याला दिसणाऱ्या पावलांसोबत आवाजही आला. तो आवाज म्हणाला, "चूक करतो आहेस बाळा. मी जर तुला कडेवर उचललं तर कसे चार पावलं दिसतील?"

भक्ताला आपली चूक समजली आणि त्याने हनुमानाची क्षमा मागितली. त्याला पुन्हा एकदा जाणीव झाली एक वेळ चांगल्या क्षणी देव आपल्याला एकटा सोडेल पण संकटांच्या वेळी तो नुसती मदत नाही करत, गरज पडली तर आपल्याला कडेवर घेऊन पळत सुटतो.

आपली चिंता कोणाला असते माहिती का?

समर्थ हा सिद्धांत समजावून सांगताना आपल्याला एक श्लोक सांगतात.

जगीं पाहतां देव हा अन्नदाता ।

तया लागली तत्वता सार चिंता ॥

तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें ।

मना सांग पां रे तुझें काय वेंचे ॥

समर्थ आपल्या मनाला सांगतात की जगात अन्नदाता बघायला गेलं तर तो एकच आहे "देव". त्याला आपली सगळी चिंता लागलेली आहे. तो सगळी चिंता करून, सगळी धडपड करून जर तुला अन्नच नाही, सगळं काही उपलबद्ध करून देतो आहे तर त्याचे नाम घेणं जे फुकट आहे ते करण्यासाठी काय जातं रे तुझं. नाम घेण्याची सवय ठेव की रे मना त्या देवाची.

बघा आईन्स्टाईन ने पण दासबोध वाचायला घेतलाआणि तुम्ही काय वेळ नाही म्हणता! (AI झिंदाबाद)

एक नाही दोन नाही १६ श्लोक सलग समर्थ फक्त नामाचं महत्व सांगत आहेत. समर्थ म्हणतात की राम नाम जिथे आहे तिथे विश्रांती आहे, जिथे राम नाम आहे तिथे काम तुम्हाला बांधू शकत नाही, मुक्ती ही नामानेच मिळू शकते, अरे कितीदा सांगितलं समर्थांनी.

आपल्या आवडीच्या देवाला आठवणं हा पार्ट टाइम जॉब असू शकतो का? तुम्ही विचार करा ना, श्वास घेणं आणि सोडणं, हृदयाचं काम करणं, फुफुस नीट काम करणं ह्याच्यात आपला काय रोल आहे? रोज झोपणं आणि सकाळी उठणं ह्यात आपला काय रोल आहे? अगदी अडचणीच्या वेळेवर एखादा व्यक्ती मदतीला येऊन जातो. आपण त्याला देवासारखा आला म्हणतो. कोणी पाठवला?

सध्याची सगळ्यांची चिंता कुठली?

सगळ्यांना एक चिंता लागलेली आहे ती चिंता कोणाकडे तरी बघून सुरु होते. त्याच्या सारखं पाहिजे, त्याच्या सारखं जमलं पाहिजे, त्याला कसं काय मिळालं, मला कधी मिळणार? पण मी म्हणतो का कोणाकडे बघून चिंता सुरु करावी? एकदा मधे डोकावून बघा. आपल्याला रोज काहीतरी सुचत असतं. कोण सुचवतो हे सगळं? काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे हे कधीही चांगलं आणि तो आपली अशी काही काळजी घेतो की काळजी करावी लागत नाही.

सगळ्या जगाच्या चिंता घेऊन बसेल पण ती बाजूला ठेवलेली

भगवतगीता वाचायला वेळ नाही ह्या पठ्ठयाला.

मी सुरवातीला काय म्हणालो ५२,००० वेळेस जरी लिहावं लागलं तरी मला सुचेल कारण सुचवणारा कोणीतरी आहे मी फक्त लिहितो आहे. मी कितीतरी वर्ष कोणाकडे तरी बघून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला पण मला यश कदाचित मिळालं असेल पण आनंद नाही मिळाला. कारण माझी काळजी करणारा मला जे सुचवत होता ना ते मी ऐकतच नव्हतो. त्याच ऐकलं आणि मग मी लिहिणं सुरू केलं. आता तुम्हीच मला प्रत्येक आठवड्यात "खूप छान अजिंक्य" अशा कमेंट देतात. आनंदच आनंद.

विषय निघाला म्हणून सांगतो तुमच्या कमेंट मला खूप आवडतात. त्या मधली "खूप छान अजिंक्य" ह्या कमेंट वरून तर माझे मित्र मला चिडवत असतात. पण मी सगळ्या कमेंट आनंदाने वाचतो, पुढचं पत्र लिहितो आणि विसरून जातो कारण ती कमेंट तुम्ही मला नाही तर मला सुचवणाऱ्याला देत आहात असं मी समजतो.

थोडक्यात काय तर तो जो अन्नदाता आहे ना त्याला आपली आपल्या पेक्षा जास्त चिंता आहे. आपल्याला जे सुचतं, जे मिळतं, जे घडतं – ते काहीतरी विशेष कारणानेच असतं.

म्हणूनच, चिंता करू नका...
तो आपली काळजी घेतो… हे विसरू नका.
इतक्या सोप्प्या भाषेत समर्थ आपल्याला तत्वज्ञान समजावून सांगत आहेत तर आपण आज खूप छान अजिंक्य पेक्षा "जय जय रघुवीर समर्थ" लिहूया आणि खूप छान अजिंक्य नेहमीसाठी नाही लिहिलं तरी चालेल, पण आज तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नाव जरूर लिहा. कारण समर्थ फुकटच नाव घ्यायला (लिहायला) तुला काय जातं रे मना असे म्हणतं आहेत. तर आपण आज सगळे नाम लिहूया. मी नेहमीप्रमाणे इतकचं सांगेल स्वस्थ रहा, मस्त रहा आणि नामस्मरणात व्यस्थ रहा. धन्यवाद.

असेच आमचे पत्र ना चुकता मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर आमचा व्हाट्सएप्प ग्रुप जॉईन करा.

Join our Whatsapp Group for weekly updates!

जर तुम्हाला असे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर आमच्या ई-मेल Newsletter ला subscribe करा.

Subscribe to our Email Newsletter.

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page