profile

Thoughts become Things!

Monkey See, Monkey Do!


।। श्री ।।


सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

इतक्या सगळ्या गोष्टीनीं भरलेल्या इंटरनेट वर तुम्ही माझं पत्र वाचण्याच्या निर्णय घेतला आहे म्हणून मला इतका आनंद झाला आहे की काय सांगावं. मस्तचं. इंटरनेट वर दुसरं काहीतरी बघतं बसण्यापेक्षा, वाचन कधीही चांगलं. माझं पत्र वाचणं त्याहून चांगलं.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. ज्यांच्या घरात लहान मुलं नाहीत, किंवा जे कोणी आपल्या आपल्या कामा मधे बिझी झालेलं आहेत त्यांना हे फार काही वेगळं वाटणारं नाही. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावाला जाणं, तिथे वेगळी मज्जा हे प्रत्येकाने अनुभवलं आहे. मी या वेळेसच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या, घरातल्या लहान मुलांमुळे. कसं तेच आज बोलूया.


मामाच्या गावाला जाऊया

फक्त मामाच्याच गावाला का बरं म्हणतात हे मला माहिती नाही? मी तर लहानपणी पासून आत्या, मामा, काकू, काका सगळ्यांच्या घरी राहून मज्जा केली आहे. या उन्हाळ्यात माझ्यासोबत माझे भाच्चा, भाच्ची होते. सगळे शाळेत जातात. सगळे मोठ्या मोठ्या शहरात राहातात. मोठ्या शहरात सगळे बिझी. इतक्या बिझी लाईफ स्टाइल मधे सगळ्यांना शुभंकरोती म्हणणे, काही बोर्ड गेम खेळणे, आंबे खाणे, चित्र रंगवणे हे करायला वेळचं मिळतं नाही.
मला ह्या सगळ्यांसोबत काही दिवस मिळाले. मी ठरवलं ह्या सगळ्यांना आपण अगदी सोप्प्या, रोज मी सोबत नसलो तरी करता येतील अशा गोष्टी शिकवू. पण शिकवणारं कसं? आपण सांगितलं आणि लहान मुलांनी ऐकलं असं झालं असतं तर सोप्प होतं की सगळं. ते कुठे ऐकतात एका सांगण्यात. पण मला एक पद्धत माहिती होती ज्या मुळे हे सगळे जणं माझं ऐकायला तयार झाले.

Monkey See, Monkey Do!

त्या पद्धतीला म्हणतात मंकी सी मंकी डू, म्हणेज आपण केलं ते लहान मुलं करतात, आपण सांगतो ते नाही. बस्स इतकं सोप्प. मी किती तरी वर्षानंतर स्वतः साठी एक कलरिंग बुक विकत घेतली आणि कलर्स सुद्धा. मी कलरिंग करण सुरु केलं आणि सोबत सगळ्यांना तेच करायला बसवलं. संद्याकाळ झाली तर मांडी घालून मोठ्याने शुभंकरोती म्हणायला मी सुरवात केली मग सगळे एक एक करून सोबत बसले. मोबाईल आणि कंम्पुटर वर गेम्स खेळण्याच्या वेळा ठरल्या आणि माझ्या लहानपणी मी जो खेळतं होतो तो बिझनेस गेम वर निघाला. त्याचं बरोबर माझ्याकडे रामायणाचा सुद्धा एक बोर्ड गेम आहे ज्यामधे खेळता खेळता लहान मुलांना रामकथा संपूर्ण पाठ होते.

मी कलर्स केलेले काही चित्र या पत्रा मधे तुम्हाला दाखवतो. मनापासून सांगतो. जो आनंद कलरिंग करण्यात आहे तो झोपून रिल्स बघण्यात येतं नाही.


हे इतकं अवघड का आहे?

समोरचा व्यक्ती आपण जे करतो त्याचं अनुकरण करतो, आपण जे बोलतो त्याचं अनुकरण नाही करतं. ही इतकी साधी गोष्ट समजायला प्रत्येकाला इतका वेळ का लागतो?समर्थ रामदास एका पत्रात लिहितात, बरे सत्य बोला यथातथ्य चाला । बहू मानिती लोक तेणे तुम्हांला ।


समर्थांच्या तर इतक्या ओव्या आणि इतके श्लोक आहेत, मला माहिती असलेले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा अर्थ असणारे काही श्लोक आणि ओव्या खाली एक एक देतो आहे तुम्ही वाचू शकता.
क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते || मनाचा श्लोक १०४
विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥ मनाचा श्लोक १०५
क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी || मनाचा श्लोक १०८
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे || मनाचा श्लोक ११४
उत्तम गुण स्वयें घ्यावे ⁠। ते बहुतांस सांगावे ⁠।वर्तल्याविण बोलावे ⁠। ते शब्द मिथ्या ⁠।⁠।⁠ दासबोध दशक १२ : समास १० : ओवी ३
बोलण्यासारिखें चालणें ⁠। स्वयें करून बोलणें ⁠।तयाचीं वचनें प्रमाणें ⁠। मानिती जनीं ⁠।⁠।⁠ दासबोध दशक १२ : समास १० : ओवी ३९


सगळे संत आपल्या मराठी भाषेत समजावून सांगतात पण तरीही ही एक गोष्ट, "जसं बोलतो तसं आपलं वागणं असावं" ही अजूनही का इतकी अवघड वाटते ह्याच उत्तर तुम्हीचं मला द्या. मी तरी सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत चित्र रंगवणे, नवा व्यापार खेळणे, थोडा वेळ टीव्ही बघणे, पुस्तकं वाचणे आणि माझा भाच्चा आणि भाच्ची सोबत एन्जॉय करण्यात थोडा बिझी आहे. आपण पुढच्या पत्रात भेटूया एका नवीन विषयासोबत.

संध्याकाळी ७ वाजता आम्ही शुभंकरोती आणि काही श्लोक यू ट्यूब वर व्हिडिओ लावून त्याच्या सोबत म्हणतो. त्याच्या लिंक इथे खाली देतो आहे ऐकून बघा कदाचित तुम्हाला ही आवडेल, तुम्ही ७ वाजता ऐकणं सुरु करा आणि तुमचं बघून तुमच्या घरातले बाकीचे पण तसंच करतील. हेच असतं Monkey See, Monkey Do!तो पर्यंत सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि न बोलता, पण क्रियेने समजून सांगण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.🙏🙏🙏

video previewvideo preview

बुद्धी दे रघूनायका

हे पत्र वाचून जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं असेल किंवा तुम्हाला "अरे ह्याची गरज होती रे मला" असं वाटलं असेल तर ही जी छान वाटणारी फिलिंग आहे ना ती स्वतः पुरती का ठेवायची? करून टाका फॉरवर्ड आपल्या काही खास मित्र आणि मैत्रिणींना. पिझ्झाचा शेवटचा त्रिकोणी तुकडा कसा आपण सगळे शेअर करून खातो तसा हा प्रकार आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला असं पत्र वाचून नक्कीच छान वाटेल.

हे असे छान कमी वेळात वाचता येणारे, माझी वाचनाची आवड हळू हळू वाढवणारे, मला काही तरी शिकवणारे, पत्र प्रत्येक रविवारी मिळावे असं वाटतं असेल तर तुम्ही इथे whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता. 👉 Thougts Become Things Whatsapp Update Channel

जर तुम्हाला वाटतं असेल की अरे whatsapp वर फार गर्दी असते आपण शांत पणे कंप्युटर किंवा लॅपटॉप वर वाचूया तर 👉 तुम्ही आमच्या ई-मेल Newsletter ला सबस्क्राईब करू शकता.

माझं पत्र वाचल्याबद्दल आणि माझे पत्र खूप खूप लोकांपर्यंत पोहचवून माझे अनऑफिशीयल पार्टनर बनल्याबद्दल आपले खूप खूप आभार. भेटूया पुढच्या पत्रात. 😊😊😊

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page